
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी जुन्या महापालिका कार्यालयाला अचानक भेट दिली. जन्म-मृत्यू दाखले आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या.
पाहणीदरम्यान कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये नागरिकांचे महत्त्वाचे जुने दप्तर आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धुळीने माखलेली कागदपत्रे पाहून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली.
यानंतर उपमहापौर जाधव यांनी थेट महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना व्हिडिओ कॉल केला. कार्यालयातील परिस्थिती, अस्ताव्यस्त रेकॉर्ड आणि कामकाजाची स्थिती त्यांनी आयुक्तांना थेट दाखवली.
नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची सुरक्षितता आणि दाखले देण्याच्या प्रक्रियेबाबत आता प्रशासन काय पावले उचलणार, याकडे लक्ष लागले आहे.





