Explained

Dr. Babasaheb Ambedkar यांना शब्द दिला अन् Datta Deshmukh यांनी दलित उमेदवाराला खुल्या जागेवरुन निवडून आणून दाखवलं

सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर, किळस येते. कोण कुणाला कसा धोका देईल, याचा भरवसा नाही. कोण कुणाचा कसा गेम करील, याचा नेम राहीलेला नाही. पण असाही एक काळ होता, जेव्हा शब्दाला किंमत होती. राजकारण बाजूला, पण एकमेकांचे संबंध महत्त्वाचे होते. जान जाये पर वचन ना जाये… असं सगळं होतं. अशाच एका वचनाचा किस्सा आपल्या कोपरगावात घडला. बरं, तो कुणाबरोबर घडला? तर खुद्द घटनापती डाँ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत… होय, राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या वचनासाठी कोपरगावच्या खुल्या जागेवर, एका दलित नेत्याला खासदार केलं होतं. आणि हा शब्द कुणी दिला होता?तर खुद्द काँग्रेड दत्ता देशमुखांनी… ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं होतं. आज दत्ता देशमुखांनी आंबेडकरांना दिलेल्या याच शब्दाचा किस्सा आपण पाहणार आहोत…

तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून, संगमनेरच्या दत्ता देशमुखांचे नाव राज्यभर आदराने घेतले जायचे. संगमनेरचं जवळे कडलग हे त्यांचं मूळ गाव. पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. परंतु त्याच काळात १९४२ चं चले जाव आंदोलन सुरु होतं. या आंदोलनात दत्ताजींनी स्वतःला झोकून दिलं. त्याच दरम्यान, पुण्यात कॅपिटल थिएटरमध्ये बाँम्बस्फोट झाला. या बाँम्बस्फोटात संशयीत म्हणून दत्ताजींना इंग्रजांनी पकडलं. येरवडा जेलमध्ये टाकलं. आता त्याच दरम्यान, दत्ताजींची बी. ई. सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा होती. इंग्रजांना माफीनामा दे, तुला परीक्षा देता येईल, असं दत्ताजींच्या मित्रांनी सांगितलं. पण दत्ताजी तत्वाचे पक्के. त्यांनी माफीनामा दिला नाही.

पाच महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यावर, त्यांनी पुढच्या वर्षी परीक्षा दिली आणि इंजीनीअर झाले. परंतु नोकरी करत असतानाही त्यांना समाजसेवा स्वस्थ बसू देईना. नोकरीसाठी आपला जन्मच झालेला नाही, असं त्यांना वाटायचं. अखेर लोकसभेच्या पहिल्या निवडणुका लागल्या आणि ते संगमनेरला आले. पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर लढून त्यांनी नगर उत्तरमधून विधानसभा निवडणूक जिंकली. पण दत्ताजी स्वस्थ बसणारे नव्हते. सरकार काँग्रेसच असलं तरी, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडली.

मोर्चे काढले. त्यामुळे संतापून बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई यांनी आपल्याच पक्षाचे विद्यमान आमदार असलेल्या दत्ता देशमुखांना जेलमध्ये टाकलं. शिवाय या दोघांनी एक गेमही केला. जेलमध्ये असल्याने दत्ताजी सलग ९० दिवस विधानसभेत गैरहजर होते. हीच संधी साधून खेर-देसाई जोडीनं, त्यांची आमदारकी रद्द केली. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र पेटला. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणाऱ्याला विधानसभेतून काढून टाकल्यावर सगळ्यांनीच सरकारचा विरोध केला. पुढे त्यांनी काँग्रेसचे विचार न पटल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, लाल निशाण पक्ष अशा पक्षात काम केलं. शेतकरी, कामगारांसाठी मोर्चे काढले. सरकारच्या नाकीनऊ आणले. पुढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. त्यात दत्ताजी सहभागी झाले. याच दरम्यान, पंतप्रधान पंडीत नेहरुंनी संयुक्त महाराष्ट्र समीतीच्या शिष्टमंडळाला भेटायला, दिल्लीला बोलावलं. त्यात दत्ताजीही होते.

याच दत्ताजींची दिल्लीत डाँ. बाबासाहेब आंबेडकरांशी भेट झाली. दोघेही यापूर्वीपासून कामगार शोषितांच्या प्रश्नावर लढत असल्याने त्यांची ओळख होती. दत्ताजी बाबासाहेबांच्या कायदेविषयक ज्ञानाचे चाहते होतेच. दिल्लीतील हीच भेट पुढे मैत्रीत बदलली. पुढे संयुक्त राष्ट्र समितीने, १९५७ च्या सार्वत्रीक निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. दत्ताजी आता डाव्या पक्षात होते. डाव्या पक्षाने रिपब्लीकन पक्षाकडे युतीचा प्रस्ताव ठेवला. सगळे डावे नेते डाँ. बाबासाहेबांना भेटायला गेले. त्यात दत्ताजीही होते. बाबासाहेबांनी अत्यंत रोखठोकपणे या नेत्यांना विचारले की, “तुम्ही आमच्या दलितांची मते घेणार, पण तुमचे सवर्ण आणि मराठा मतदार आमच्या दलित उमेदवाराला मतदान करणार का?” या प्रश्नावर इतर नेते शांत राहिले. पण दत्ता देशमुख बाह्या सरसावून उभे राहिले. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की, “बाबासाहेब, तुमच्या उमेदवाराला माझ्या स्वतःच्या मतदारसंघातून खुल्या जागेवर निवडून आणण्याची जबाबदारी माझी! मी स्वतः मराठा मतदारांच्या दारात जाऊन तुमच्या उमेदवाराला मत मागेल.” देशमुखांचा हा करारीपणा पाहून बाबासाहेबांना हसू आलं. पण त्यांचा दत्ताजींवर विश्वास होता. त्याच बैठकीत असलेल्या बी. सी. कांबळेंकडे पाहून बाबासाहेब म्हणाले, “कांबळे, तयारीला लागा. हा माणूस शब्दाचा पक्का आहे.”

पुढं झालंही तसंच. या निवडणुकीत काँग्रेसनं विद्यमान खा. पंढरीनाथ कानवडे यांना उमेदवारी दिली. तर विरोधात डावे पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची युती होती. याच युतीकडून दत्ता देशमुखांनी बापू चंद्रसेन अर्थात बी. सी. कांबळेंना उमेदवारी दिली. मुळात हा मतदारसंघ मराठा बहूल होता. सहकारातील नेत्यांचा हा मतदारसंघ होता. अकोले, कोपरगाव, संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यात काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते कानवडेंच्या पाठीशी होते. कानवडे हे स्वतः मराठा समाजातील मोठे नेते होते. परंतु तरीही दत्ता देशमुखांनी जोर लावला. डाँ. बाबासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पायाला भिंगरी बांधली. दत्ता देशमुखांनी या सगळ्याच तालुक्यात स्वतः कांबळेंचा प्रचार केला.

स्थानिक शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत गरीब मराठा शेतकऱ्यांनाही पक्षाची भूमिका समजावून सांगितली. बैलगाड्या, सायकली किंवा थेट पायी प्रचार करुन दत्ताजींनी मतदारसंघातलं वातावरण फिरवलं. परंतु निवडणुकीपूर्वीच एक दुःखद घटना घडली. ६ डिसेंबर १९५६ ला आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर तीन महिन्यांनी, म्हणजेच मार्च १९५७ ला लोकसभेचं मतदान पार पडलं. अशा अत्यंत कठीण आणि भावूक परिस्थितीत दत्ताजी थांबले नाहीत.

बाबासाहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी, मतदानापूर्वीचे दोन महिने त्यांनी जास्त जोर लावला. जी राजकीय रणनीती, बाबासाहेबांनी आखून दिली होती, तिच दत्ताजींनी पुढे नेली. आणि खुल्या असलेल्या कोपरगाव मतदारसंघातून ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या पाठिंब्यावर दलित समाजातील बी. सी. कांबळेंना निवडून आणून दाखवलं. कांबळे यांनी तब्बल ६४.४३% मते मिळवत विद्यमान खासदार असलेल्या पंढरीनाथ कानवडे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बी. सी. कांबळे यांना ९२ हजार ५०१ मतं मिळाली. तर कानवडे यांना फक्त ५१ हजार ०७२ मते मिळाली. हा प्रचंड बहुमताचा विजय ठरला. हा विजय बाबासाहेबांच्या विचारांना आणि त्यांच्या इच्छेला श्रद्धांजली ठरली.

आंबेडकरांना दिलेला शब्द दत्ताजींनी त्वेषानं लढून पूर्ण केला होता. खुल्या मतदारसंघात दत्ताजींनी दलित उमेदवार खासदार म्हणून निवडून आणला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button