Latest

डॉक्टर गांधींकडून ‘सुरभि’त कोविड बिलांचा घोटाळा? २ कोटी ७४ लाखांचा गैरव्यवहार

अहिल्यानगर येथील सुरभि हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये २ कोटी ७४ लाख रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राकेश कांतिलाल गांधी व इतरांविरुद्ध आर्थिक अफरातफर, फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि पुरावा नष्ट केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

२०१७ ते मार्च २०२३ या कालावधीत कथित गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २३० रुग्णांच्या बिलांची नोंद कंपनीच्या खात्यांत नसल्याचे आढळले. यात सुमारे २ कोटी ३० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.

तसेच राकेश गांधी व आशिष भंडारी या दोघांच्या पत्नी व समृद्धी विजय निकम या तीन महिलांच्या नावाने समृद्धी हेल्थकेअर नावाची फर्म तयार करून त्यातून कुठलीही सेवा न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पैसे लाटले.

तसेच हॉस्पिटलचे सुमारे ४४ लाख रुपये स्वतःकडे ठेवले. हॉस्पिटल सॉफ्टवेअरमधील नोंदींमध्ये फेरफार केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

हे रेकॉर्ड व्यवस्थित करण्यासाठी एका सीएने मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी तपास करीत असून, तपासात गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button