
सोने खरेदीचा विचार करताय? मग हा नवा नियम तुमच्या बजेटवर थेट परिणाम करू शकतो. मंडळी, सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. BIS म्हणजेच भारतीय मानक ब्युरोने सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात मोठी वाढ केली आहे.
आतापर्यंत सोन्याच्या प्रत्येक आर्टिकलसाठी ४५ रुपये हॉलमार्किंग फी आकारली जात होती. आता ही फी थेट ७५ रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच शुल्कात जवळपास ६७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
नवीन नियमानुसार एका कन्साइनमेंटसाठी किमान २०० रुपये शुल्कही द्यावे लागेल. मात्र चांदीच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. चांदीसाठी प्रति आर्टिकल ३५ रुपये आणि कन्साइनमेंटसाठी किमान १५० रुपये शुल्क कायम आहे.
हॉलमार्किंगमुळे दागिन्यातील मौल्यवान धातूची शुद्धता तपासण्यास मदत होते. त्यामुळे ग्राहकांसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते.
मात्र शुल्कवाढीमुळे ज्वेलर्सचा अनुपालन खर्च वाढण्याची शक्यता आहे. ज्वेलरी उद्योग संघटनेनेही या वाढीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.





