
श्रीरामपुरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता थेट मोक्काचा बडगा उगारला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या जेधे-बेग टोळीतील चार आरोपींसह दोन विधीसंघर्षित बालकांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमानुसार आधीच गुन्हा दाखल होता.
आरोपींच्या संघटित हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी मोक्का लावण्याचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच गुन्ह्यात मोक्काची कलमे वाढवण्यात आली.
या कारवाईत विजय मुन्ना जेधे ऊर्फ गोरख जेधे, मनोज संजय साबळे, सोनू ऊर्फ जयप्रकाश बेग आणि अंकुश रमेश जेधे यांच्यासह दोन बालकांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करत आहेत. श्रीरामपुरातील गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांचा हा मोठा इशारा मानला जात आहे.





