
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी अहिल्यानगर शहर सज्ज झालंय… पण यंदा गर्दी कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी महापालिकेने खास नियोजन केलंय !
शहरात गणेश विसर्जनासाठी एकूण २० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये ३ पारंपरिक विसर्जन स्थळांसह तब्बल १७ कृत्रिम विसर्जन कुंडांचा समावेश आहे.
कल्याण रोडवरील बाळाजीबुवा विहीर, सावेडी पाइपलाइन रोडवरील यशोदानगर विहीर आणि बुरुडगाव रोडवरील साईनगर येथील आरसीसी हौद ही पारंपरिक ठिकाणे आहेत.
तर बोल्हेगाव, सावेडी, केडगाव, सारसनगर, शिवनेरी चौक, गोविंदपुरा, भिस्तबाग, गांधी मैदान, मार्केटयार्ड, मोतीनगर, ताठे मळा आणि नगर-दौंड रोड परिसरात कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांनी आपल्या परिसरातील जवळच्या विसर्जन स्थळी गणेशमूर्तीचे विसर्जन करून गर्दी टाळावी, असं महापालिकेचं आवाहन आहे. ‘स्वच्छ शहर, सुरक्षित विसर्जन आणि पर्यावरण संरक्षण’ या संकल्पनेतून ही व्यवस्था करण्यात आली आहे.





