
अहिल्यानगरमध्ये जनगणनेच्या तयारीदरम्यान एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता निवृत्त होणारे आणि आजारी कर्मचारी यांना जनगणनेच्या कामातून सूट देण्यात येणार आहे. मंडळी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत.
जनगणनेसाठी नियुक्त होणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांची माहिती सीएमएमएस पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. पण यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे जे कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत किंवा वैद्यकीय रजेवर आहेत, त्यांची नावे यादीतून वगळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण एकदा ही माहिती अंतिम झाली की त्यामध्ये पुढे कोणताही बदल करता येणार नाही.
त्यामुळे सर्व तहसीलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, जनगणनेच्या कामाचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, घरयादी गट निश्चिती आणि नकाशांचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण झाले पाहिजे.
ज्या ठिकाणी काम संथ गतीने सुरू आहे, त्यांनी गरज पडल्यास सुट्टीच्या दिवशीही काम करून २० एप्रिलपर्यंत ते पूर्ण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच, कामात प्रगती न दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही इशारा देण्यात आला आहे. तातडीने कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाई होऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत.





