
गेल्या काही दिवसांपासून वातावरण अचानक बदलले आहे. पारा 34 अंशावरुन थेट 40 अंशाच्या पुढे गेलाय. वाढत्या उष्णतेने प्रशासनानेही शाळांच्या वेळा बदलल्यात. आता हवामान खात्याकडून नगरकरांचं टेन्शन वाढविणारी बातमी पुढे आली आहे.
19 ते 22 एप्रिल या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. रविवारी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी, जिल्ह्यात कोठेही पावसाची नोंद नव्हती. परंतु तरीही पुढील तीन दिवस सतर्क राहण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. 20 एप्रिलला दुपारनंतर 30 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाचासह पावसाची शक्यता सांगितली गेली आहे.
22 ते 25 एप्रिललाही पारा 40 अंशाच्या पुढे जाईल परंतु तरीही दुपारनंतर 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहून वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या शेतात गव्हाची काढणी उरकली असली तरी चारापिके उभी आहेत. या चारापिकांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या इशाऱ्याची दखल घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





