
अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा सौर ऊर्जा प्रकल्प आता लालफितीत अडकलाय, मंडळी, कर्जत वीज उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या कापरेवाडी, शिंदेवाडी, कोरेगाव, बहिरोबावाडी, धांडेवाडी, भांडेवाडी, जोगेश्वरवाडी, बर्गेवाडी आणि पठारवाडी या गावांतील जवळपास 10 हजार कृषीपंपधारक शेतकरी सध्या अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणीत आहेत.
यावर उपाय म्हणून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अंतर्गत 21 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाजनको या शासकीय संस्थेला हे काम देण्यात आलं आणि दोन वर्षांपूर्वीच वर्क ऑर्डरही दिली गेली. पण धक्कादायक बाब म्हणजे 18 महिन्यांत पूर्ण होणारा हा प्रकल्प अजून सुरूही झालेला नाही. कापरेवाडी येथे जागा उपलब्ध असतानाही महावितरण आणि वन विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा प्रकल्प पूर्णपणे रखडला आहे.
याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पुरेशा दाबाने आणि योग्य वेळेत वीज मिळत नसल्याने शेतीसाठी पाणीपुरवठा आणि पिकांचे व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मंडळी, एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना आणि दुसरीकडे त्याच योजनेला लालफितीचा अडथळा.. यामध्ये शेवटी त्रास सहन करावा लागतो तो शेतकऱ्यांनाच. मंडळी, शासनाच्या या उदासीन धोरणाबाबत तुमचे मत काय? कमेंट करा..





