
अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. एकेकाळी मोठ्या प्रमाणात दिसणारी चंदनाची झाडं आता नगर तालुक्यातून अक्षरशः हद्दपार झाली आहेत आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे वाढती चोरी. मंडळी, दोन दशकांपूर्वी नगर तालुक्यातील डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडं होती. पण आता परिस्थिती इतकी बदलली आहे की चंदनाची झाडं दुर्मिळ झाली आहेत.
शेतकऱ्यांच्या बांधावर असलेली झाडंसुद्धा चंदन चोरांकडून सर्रास चोरली जात आहेत. आणि नुकताच एक धक्कादायक प्रकार घडलाय. थेट वन विभागाच्या जिल्हा कार्यालय परिसरातच चंदन चोरी झाली. पहाटेच्या सुमारास पाच तस्करांनी कार्यालयात प्रवेश केला.
झाड तोडण्याचा आवाज ऐकून दोन वन कर्मचारी तिथे गेले पण तस्करांनी त्यांनाच मारहाण करून बांधून ठेवत चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी केली आणि पसार झाले. म्हणजेच, ज्या ठिकाणी चंदनाचं संरक्षण व्हायला हवं, तिथेच अशी धाडसी चोरी झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंडळी, एकीकडे चोरी आणि दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडून पैशासाठी होणारी विक्री यामुळेच नगर तालुक्यातून चंदनाची झाडं हळूहळू संपत चालली आहेत. यामुळे अहिल्यानगर तालुक्यातून आता चंदनाची झाडे दिसेनाशी झाली असून चंदन हद्दपार झाले आहे.





