संगमनेरचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील हे तब्बल २१ वर्षे आमदार होते. या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी तब्बल १८ वर्षे मंत्रीपदही भोगलं. महत्त्वाच्या खात्यांचे कँबिनेट व राज्यमंत्रीपद भोगणाऱ्या या नेत्यानं खऱ्या अर्थानं प्रामाणिक राजकारणाचा वस्तूपाठ घालून दिला. परंतु याच ऋषितूल्य समजल्या जाणाऱ्या खताळांचा सहाकरमहर्षी समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब थोरातांनी एकदा पराभव केला होता. अर्थात, आजचा विषय आपण हार-जीत म्हणून नाही, तर तत्वनिष्ट राजकारणाचं एक उत्तम उदाहरण म्हणून पाहणार आहोत. काय झालं होतं या १९७८ च्या निवडणुकीत? आणि खताळ- थोरात समोरासमोर का लढले? हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत…
२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या दोन वर्षांत देशात आणीबाणी लावून इंदिरा गांधींनी लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवला. त्याला देशभरातून विरोध झाला. काँग्रेसचे अनेक नेतेही नाराज झाले. काँग्रेसमध्ये दोन गट पडले. पहिला होता इंदिरा गांधीनिष्ठ आणि दुसरा होता काँग्रेस पक्षनिष्ठ. केंद्रात जसं झालं, तसं राज्यातही झालं. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार असे नेते काँग्रेस पक्षनिष्ठ अर्थात रेड्डी काँग्रेसमध्ये राहीले. त्यानंतर १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधीचा दारुण पराभव झाला. जनता पक्षाचे सरकार आले. त्यानंतर वर्षभरात म्हणजेच, १९७८ ला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या.
दोन्ही काँग्रेसने या निवडणुका स्वतंत्र लढवल्या. शिवाय सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना करुन, निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यावेळी संगमनेरचे विद्यमान आमदार होते बी. जे. खताळ पाटील. खताळ हे यशवंतरावांच्या गटाचे मानले जायचे. त्यामुळे इंदिरा काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळणारच नव्हते. परंतु यशवंतराव चव्हाणांच्या गटातही वेगळंच काहीतरी शिजलं, आणि खताळांऐवजी सहकारधुरिणी असणाऱ्या भाऊसाहेब संतुजी थोरातांना काँग्रेसकडून तिकीट मिळालं. खताळांना ही गोष्ट खटकली. परंतु कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे, त्यांनी जनता पक्षाकडून उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
भाऊसाहेब थोरात हे खरंतर कम्युनिष्ट विचारांचे. त्यांनी सेवादलाचे सैनिक बनून १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या १८ व्या वर्षी उडी घेतली. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड पी. बी. कडू, धर्मा पोखरकर, पांडुरंग भांगरे, नारायण अहिरे, भास्करराव दुर्वे व भाऊसाहेब थोरातांनी अकोले येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तेथे प्रतिसरकार स्थापन केले होते. रस्त्यावरचे पूल तोडणे, टेलिफोनचे खांब मोडूणे, सरकारी मालमत्तेला आगी लावून नुकसान करणे अशी अनेक आंदोलने त्यांनी पारतंत्र्यात केली. मुंबईतल्या मुषक महलमध्ये साने गुरुजी, भाऊसाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते लपून बसल्याची बातमी ब्रिटीश सरकारला मिळाली. त्यांनी टाकलेल्या छाप्यात भाऊसाहेब थोरात इंग्रजांच्या हाती लागले. नंतर त्यांना नाशिकच्या सेन्ट्रल जेलमध्ये टाकले.
तुरुंगात असतांना त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला व पक्के कम्युनिष्ट विचाराचे बनले. तुरुंगातून सुटका झाल्यावर भाऊसाहेबांना शेतकऱ्यावर जुलूम करणाऱ्या सावकारशाही विरुद्ध लढा सुरु केला. त्यांच्या उपस्थितीत खिरविरे शिवारात सावकारकीची कागदपत्रे जाळण्याचे आंदोलनही झाले होते. पुढे १९६० ला संगमनेर कारखान्याच्या उभारणीतही ते अग्रभागी राहिले. त्याच वर्षी समाज मंदीर या माध्यमिक विद्यालयाची त्यांनी स्थापना केली. १४ जानेवारी १९६२ ला संगमनेरच्या नेहरु चौकात यशवंतराव चव्हाणांची सभा झाली. त्याच सभेत भाऊसाहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९६५ ला जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्य सहकारी बँकेचे संचालकही ते राहिले. १९७८ ला संगमनेर तालुका दूध संघाचीही त्यांनी स्थापना केली. या एवढ्या सगळ्या सामाजिक कार्यामुळे काँग्रेसनं त्यांनाच उमेदवारी दिली.
आता निवडणुकीत रंगत आली होती. थोरात व खताळांसह कम्युनिष्ठ पक्षाकडून त्र्यंबक सोनवणे हेही रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात गाजलेल्या, चुरशीच्या आणि नाट्यमय निवडणुकांपैकी ही एक निवडणूक होती. एका बाजूला सलग १६ वर्षे राज्य मंत्रिमंडळात दबदबा असलेले निष्णात कायदेतज्ज्ञ बी. जे. खताळ पाटील होते, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी-आदिवासींचे प्रश्न घेऊन लढणारे डाव्या विचारांचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात होते.
या निवडणुकीचा निकाल इतका अटीतटीचा झाला की शेवटच्या फेरीपर्यंत कोणाचा विजय होणार, हे सांगणे अवघड होते. खताळ आणि थोरातांमध्ये प्रत्येक टेबलवर मतांची चुरस सुरू होती. अखेर जेव्हा अंतिम निकाल समोर आला, तेव्हा अवघ्या १,१०१ मतांच्या फरकाने भाऊसाहेब थोरातांनी खताळ पाटलांसारख्या दिग्गज मंत्र्याला पराभवाचा धक्का दिला होता. या निवडणुकीत थोरातांना ३३ हजार ६२७ मते मिळाली. तर खताळांना ३२ हजार ५२६ मते मिळाली. कम्युनिष्ठ पक्षाच्या त्र्यंबक सोनवणे यांनी ५ हजार ८०५ मतांपर्यंत मजल मारली होती.
या निवडकीपूर्वी थोरातांच्या एक मोर्चा चांगलाच गाजला होता. १९७७ साली रिझर्व बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजदरात दोन टक्क्यांची वाढ केली होती. हा निर्णय थोरातांना अजिबात आवडला नव्हता. याविरोधात तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी मुंबईत मोर्चा काढला. खरंतर तेव्हा सरकार काँग्रेसचंच होतं. परंतु तरीही आपल्याच सरकारविरोधात थोरातांनी मोर्चा काढल्यामुळे या मोर्चाची चांगलीच चर्चा झाली. अखेर केंद्राला व रिझर्व बँकेलाही नमतं घ्यावं लागलं व त्यांनी वाढवलेला व्याजदर कमी केला. पुढे आमदार झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात मोर्चा काढला.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने शेतीला पाणी उपसा करणाऱ्या पंपांना मीटर लावून त्यानुसार बिल आकारणी सुरू केली होती. “शहरातील उद्योगांना सवलतीच्या दरात वीज दिली जाते, तर मग शेतकऱ्यांना मीटरने महागडे बिल का?” अशी आग्रही आणि रोखठोक भूमिका थोरातांनी घेतली. त्यांनी राज्यभर फिरून जनमानसात जागृती केली आणि स्वतःच्याच शासनाविरोधात शेतकऱ्यांचा ‘मीटर हटाव’ महामोर्चा काढला. थोरातांच्या या मोर्चापुढेही सरकारला झुकावं लागलं. आणि तेथून पुढं शेतकऱ्यांना हाँर्स पाँवर नुसार स्थिर बिल आकारण्याच निर्णय झाला. हा निर्णय अजूनही सुरुच आहे.
प्रत्येक वर्षी आंदोलन करणारा हा नेता राजकारणी नाही तर फक्त समाजकारणी होता. भाऊसाहेब थोरात हे मूळचे डाव्या चळवळीतील आणि शेतकरी-आदिवासींचे प्रश्न सोडवणारे नेते होते. केवळ आमदारकीची पदे भूषवून समाजाचा शाश्वत विकास होत नाही, असं त्यांच मत होतं. त्यामुळे त्यांनी आपला संपूर्ण वेळ संगमनेर भागातील सहकारी चळवळ, बँका, आणि साखर कारखान्याच्या संवर्धनासाठी देण्याचं ठरवलं आणि १९८० च्या निवडणुकीतून माघार घेतली. एवढ्या मोठ्या मंत्र्याला पराभूत करणारा हा नेता राजकारणात रमलाच नाही. अखेर त्यांनी माघार घेतल्यानंतर १९८० ला पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकीटावर लढून बी. जे. खताळ पाटील आमदार झाले. त्यांनीही वयाची साठ वर्ष पुर्ण केल्यानंतर या निवडणुकीनंतर राजकारणातून संन्यास घेतला. खुर्चीपेक्षा कामाला महत्त्व देणारे हे दोन्ही नेते संगमनेरची खऱ्या अर्थानं शान ठरले.





