
अहिल्यानगरमध्ये सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे.फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर बनावट खाती तयार करून तरुण-तरुणींना त्रास देण्याच्या घटना समोर येत आहेत.
प्रेमसंबंध तुटल्यानंतर किंवा वैयक्तिक रागातून दुसऱ्याच्या नावाने फेक अकाउंट उघडणे, जुने फोटो व्हायरल करणे आणि बदनामीकारक पोस्ट टाकण्याचे प्रकार घडत असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी सांगितले.
शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील कमल एज्युकेशन संस्थेत आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अशा प्रकारांमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
विशेष म्हणजे, बनावट खाते तयार करणारी व्यक्ती सहज सुटू शकत नाही. ईमेल आणि मोबाईलच्या आयएमई क्रमांकांच्या आधारे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत होते.त्यामुळे अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नका. संशयास्पद फाईल्स डाउनलोड करू नका आणि अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलवर विश्वास ठेवू नका.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा, अन्यथा एका चुकीमुळे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते!





