
अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या मूग, उडीद आणि तुरीच्या दरात प्रचंड तेजी पाहायला मिळत असून मुगाला चक्क ९ हजार रुपयांच्या पुढे भाव मिळत आहे.
नगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाच्या दराने उच्चांक गाठला आहे.यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ज्वारी, गहू या पिकांची लागवड कमी झाली असून त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे.
परिणामी, बाजारपेठेत मालाची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. नगर बाजार समितीत सोयाबीनला ७ हजार रुपये, तर तुरीला प्रति क्विंटल ९,५०० रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळाला आहे.
एवढेच नाही तर मसाल्याची राणी असलेल्या मिरचीनेही २० हजारांचा टप्पा ओलांडला असून गव्हाच्या दरातही क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ झाली आहे.
या वाढत्या दरांमुळे बाजारात तेजीचे वातावरण असले, तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईची झळ सोसावी लागत आहे. येत्या काळात ज्वारीचे दरही प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.





