
पारनेरच्या बैलपोळा मिरवणुकीत यंदा बैलजोड्यांपेक्षा एका घोषणेनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले! ती घोषणा होती, ‘भावी नगराध्यक्ष युवराज पठारे!’ नगरसेवक पै. युवराज पठारे यांच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी पारनेरमध्ये भव्य बैलपोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
ढोल-ताशांचा गजर, सजवलेल्या बैलजोड्या आणि युवकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात जल्लोष पाहायला मिळाला. महोत्सवाचे खास आकर्षण ठरली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बैलगाडा शर्यतींमध्ये तब्बल ३६ वेळा प्रथम क्रमांक मिळवलेली बैलजोडी.
या २२ महिन्यांच्या बैलजोडीची किंमत तब्बल ६ लाख ५१ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मिरवणुकीत समर्थकांनी दिलेल्या ‘भावी नगराध्यक्ष’ घोषणांमुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली.
यावर युवराज पठारे यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या विचारांचा नगराध्यक्ष पारनेरला मिळेल, असे विधान केले.
विशेष म्हणजे, महोत्सवाचा उद्देश राजकारण नसून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता प्रश्न एकच, पारनेरच्या आगामी नगरपंचायत निवडणुकीत युवराज पठारे यांच्या नावाची चर्चा आणखी रंगणार का?





