
अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा बाजारात कांद्याने पुन्हा एकदा चांगला भाव मिळवला आहे. उच्च प्रतीच्या गावरान कांद्याला श्रीरामपूर एपीएमसीमध्ये तब्बल ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे वाढत्या वाहतूक खर्चाचं संकटही समोर येत आहे.
शुक्रवारी श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये तब्बल १० हजार ३१५ गोण्यांची आवक झाली. यामध्ये प्रथम श्रेणीच्या कांद्याला ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये, तर द्वितीय श्रेणीच्या कांद्याला २ हजार ५०० ते ३ हजार ४५० रुपये भाव मिळाला.
तृतीय श्रेणीचा कांदा १ हजार ६०० ते २ हजार ४५०, गोल्टी कांदा २ हजार ते ३ हजार ८००, तर खाद कांद्याला ५०० ते १ हजार ५५० रुपये दर मिळाला. विशेष म्हणजे, श्रीरामपूरच्या कांद्याला आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूसह दक्षिणेकडील राज्यांतून मागणी आहे.





