
रुग्णालयाचं बिल पाहून धक्का बसतोय? कारण मेडिकल साहित्याच्या किमतीत मोठा फरक असल्याचं FDA च्या सर्वेक्षणातून समोर आलंय! महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेडिकल साहित्याच्या किमतींबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.
FDA च्या सर्वेक्षणात खरेदी किंमत आणि छापील MRP मध्ये मोठी तफावत आढळल्याचं सांगण्यात आलं. यात अवघ्या 11 रुपये 5 पैशांना खरेदी केलेल्या IV इन्फ्यूजन सेटवर 325 रुपये MRP असल्याचं आढळलं.
76 रुपये 75 पैशांच्या सिरिंजची MRP 257 रुपये, तर 29 रुपये 41 पैशांच्या कॅथेटरवर 310 रुपये MRP असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. उपचार सुरू असताना रुग्णाला पर्याय तपासण्याची किंवा दरांची तुलना करण्याची संधी अनेकदा मिळत नाही, असा मुद्दा मुंढेंनी मांडला.
या दरातील तफावत रोखण्यासाठी FDA ने केंद्र सरकार आणि NPPA कडे स्पष्ट नियमांची शिफारस केली आहे. रुग्णांच्या खिशावरचा हा अतिरिक्त भार कधी थांबणार?





