
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंडळी, नेवासा तालुक्यातील चांदा गावाजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव अचानक मोठ्या प्रमाणात खचल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. त्यावेळी कालव्यात तब्बल ११०० ते १२०० क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता.
सायंकाळी कालवा निरीक्षक श्री. काकडे यांना ही बाब लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. मुख्य अभियंता सायली पाटील यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसीलदार संजय बिरादार आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
धोका लक्षात घेऊन कालव्यातील पाणी चाऱ्या आणि उपलब्ध आऊटलेटमधून सोडण्यात आलं. चांदा, बऱ्हाणपूर, रस्तापूर आणि वडाळा परिसरात ध्वनीक्षेपक व सोशल मीडियातून नागरिकांना सतर्क करण्यात आलं.
पाटबंधारे विभागाने तातडीने मशिनरी लावून दुरुस्तीचं काम सुरू केलं. रात्रीपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने मोठा धोका टळला. आज आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
“गणरायाच्या कृपेने मोठं संकट टळलं,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कालवा फुटला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.





