
अहिल्यानगरमध्ये गॅस टाकीच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. मंडळी, कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथे ही धक्कादायक घटना घडली.
सुनील सोन्याबापू कर्पे यांच्या घरात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. घटनेच्या वेळी घरात सुनील कर्पे, त्यांची १७ वर्षांची मुलगी भाग्यश्री आणि १५ वर्षांचा मुलगा ओमकार हे तिघे उपस्थित होते. अचानक झालेल्या या भीषण स्फोटामुळे तिघेही गंभीररीत्या भाजले गेले.
स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आले. गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं. त्यानंतर खासगी वाहनातून त्यांना कोपरगावपर्यंत आणि पुढे रुग्णवाहिकेतून लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
या स्फोटाची तीव्रता किती मोठी होती, याचा अंदाज यावरून येतो की घराचे पत्रे तब्बल १०० ते १२५ मीटरपर्यंत उडून गेले. सुदैवाने हे पत्रे कोणालाही लागले नाहीत. मात्र संपूर्ण घराची मोठी पडझड झाली असून घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मंडळी, गॅस वापरताना अत्यंत काळजी घेणं किती महत्वाचं आहे, याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेमुळे झाली आहे.





