
अहिल्यानगर शहरातील नवीपेठेच्या संकलेचा बोळ येथे शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास शंभर वर्षे जुना वाडा अचानक कोसळला. घरात तिघे जण झोपलेले असताना वाड्याचा दक्षिणेकडील भाग माती, लाकूड आणि मलब्यासह कोसळला.
या ढिगाऱ्याखाली ७२ वर्षीय अरुणा नंदकुमार बागोडे अडकल्या. मात्र, त्यांच्या अंगावर पडलेले वॉशिंग मशीन अक्षरशः जीवनरक्षक कवच ठरले. मशीन आणि जमिनीमध्ये निर्माण झालेल्या पोकळीमुळे त्यांना श्वास घेण्यासाठी जागा मिळाली आणि मोठी दुखापत टळली.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस आणि अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवत जवळपास तासभर बचावकार्य सुरू होते. मिसाळ यांनी अरुणा यांच्याशी सतत संवाद साधून त्यांना धीर दिला.
अखेर अथक प्रयत्नांनंतर अरुणा यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर शहरातील धोकादायक जुन्या वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





