
“एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास… आता मुंबईच्या पूर्व विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदापर्यंत!”
ही यशोगाथा आहे श्रीगोंदा तालुक्यातील भानगावचे सुपुत्र IPS अधिकारी धनंजय कुलकर्णी यांची.
धनंजय कुलकर्णी यांना मुंबई पोलिस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे. यामुळे श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण आहे.
कृषी शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. मेहनत, प्रामाणिकपणा आणि धाडसी कामगिरीच्या जोरावर त्यांनी IPS पदापर्यंत मजल मारली. मुंबई पोलिस दलात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
दहशतवादविरोधी पथक, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच मुंबई पोलिसांचे अधिकृत प्रवक्ते म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. इतकेच नाही, तर त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेत आणि इंटरपोलमध्येही सेवा दिली आहे.
नक्षलग्रस्त भागातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना विशेष सेवा पदक आणि राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरवण्यात आले आहे. नक्कीच श्रीगोंद्याच्या मातीतील हा अधिकारी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे !





