
श्रीगोंदा शहरात एका पुरोगामी घटनेने समाजाचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता रामभाऊ खामकर यांचं वयाच्या ६०व्या वर्षी आजारपणाने निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या दोन्ही मुलींनी पार पाडली.
स्वरांजली ज्ञानदेव वाघ-खामकर या सोलापूर येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर प्रांजली प्रमोद शिंदे-खामकर या अहिल्यानगर शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. आईच्या निधनानंतर दोन्ही मुलींनी तिच्या पार्थिवाला खांदा दिला.
स्मशानभूमीत मुखाग्नी देत पुढील विधींमध्येही सहभाग घेतला. संगीता खामकर यांनी आयुष्यभर महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक प्रबोधनासाठी काम केलं.
खामकर दाम्पत्याने मुलगा-मुलगी असा भेद कधीच केला नाही. विशेष म्हणजे, पारंपरिक अस्थी विसर्जनाऐवजी आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ सहा वृक्ष लावण्याचा निर्णय मुलींनी घेतला आहे. पुढील दशक्रिया विधीही सत्यशोधक पद्धतीने करण्याचा कुटुंबाचा संकल्प आहे.





