
चेन्नई-बंगळुरू द्रुतगती महामार्गावर बंगारपेटजवळील मारगल येथे २५ सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता भीषण अपघात झाला. तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने परतणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले.
कार दुभाजकाला धडकली आणि अनेक वेळा उलटली.या दुर्घटनेत श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील युवा उद्योजक किरण बाळासाहेब जगदाळे आणि नवनाथ गोरख गायकवाड यांच्यासह विशाल अशोक शेडगे, तसेच कारचालक विश्वनाथ दिगंबर पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
तर सोमनाथ कोल्हे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोलार तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच केजीएफचे पोलीस अधीक्षक हिमांशू राजपूत आणि पोलीस निरीक्षक रविकुमार यांनी घटनास्थळी पाहणी केली. या दुर्घटनेने अजनूज गावावर शोककळा पसरली असून, दोन्ही युवा उद्योजकांवर २६ सप्टेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले.





