
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने ओळख निर्माण करणाऱ्या अहिल्यानगरच्या एका युवा खेळाडूचा प्रवास अचानक थांबला आहे. क्रिकेटपटू यश अविनाश जाधव याचे अपघाती निधन झाल्याची बातमी समोर आली असून, क्रीडाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
यश हा अहिल्यानगरमधील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने राज्याबाहेरही क्रिकेटमध्ये ठसा उमटवला होता. त्याने पाँडिचेरी राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
इतकंच नाही, तर प्रतिष्ठेच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही तो पाँडिचेरी संघाकडून खेळला होता. महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये यशने पुणेरी बाप्पा संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच जेट्स संघातील तो प्रमुख खेळाडू होता.
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्याची कारकीर्द संपल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. यशच्या पश्चात आई, वडील आणि आजी असा परिवार आहे.





