
ग्रामीण भागातून आलेल्या एका लेकीने आपल्या अचूक नेमबाजीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील अन्विता विजय जाधव हिने २८ व्या ऑल इंडिया कुमार सुरेंद्र सिंग इंटर-स्कूल शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावले.
भोपाळ येथे ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत अन्विताने महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले. १० मीटर पीप साईट एअर रायफल सब-युथ वुमन, १६ वर्षांखालील सांघिक प्रकारात तिने दमदार कामगिरी केली.
अन्वितासह संघातील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाने अव्वल स्थान मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. अहिल्यानगरमधील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या अन्विताच्या यशामागे प्राचार्या नम्रता ओहोरी, शिक्षकवृंद तसेच प्रशिक्षक छबुराव काळे आणि ऋषिकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





