
चांभुर्डीतील ढगे मळा परिसरात काम करताना ३८ वर्षीय खुशाल मानसिंग घाडगे यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर वीज उपकेंद्रांतर्गत ही दुर्दैवी घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजता घडली.
घाडगे हे बारामती येथील श्री गणेश इंडस्ट्रियलच्या माध्यमातून बाह्यस्रोत्र कर्मचारी म्हणून कार्यरत होते. नादुरुस्त विद्युतवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी ते चांभुर्डीतील ढगे मळा परिसरात गेले होते.
संबंधित भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वीजपुरवठा बंद असतानाही हा अपघात नेमका कसा घडला? याची चौकशी होण्याची मागणी होत आहे. वैद्यकीय आणि पंचनामा अहवालानंतर नियमानुसार आर्थिक भरपाई दिली जाणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
घाडगे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने परिवारावर मोठे संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





