
आदर्श पुरस्कार मिळालेल्या पतसंस्थेत सुद्धा गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित नाहीत, संस्थेचे ठेवीदार पैसे मिळण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत ! अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ‘साईसेवा’ पतसंस्था आणि मल्टीस्टेट संस्थेत हा प्रकार घडलाय.
ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, मागील एक वर्षापासून त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. संस्थेचे अध्यक्ष परागंदा झाले असून अनेक संचालक फरार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे मोबाईलही बंद किंवा नॉट रिचेबल आहेत.
ठेवीदार कृती समितीचा आरोप आहे की, संस्थेतील पैशांचा वापर जमीन खरेदी, व्यवसाय, इव्हेंट आणि आलिशान गाड्यांसाठी करण्यात आला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनाही कोट्यवधींची कर्जसूट दिल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, काही ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली असून श्रीगोंदा न्यायालयाने संबंधित पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
सहकार विभागाच्या कारवाईतील विलंबामुळे ठेवीदारांमध्ये संताप वाढत आहे. “आमचे पैसे परत मिळणार का?” हा प्रश्न आता हजारो कुटुंबांसमोर उभा आहे.





