Explained

Ajit Pawar Death | दाते- लहामटेंना आमदार करण्यापासून, विखेंची जुळवून घेण्यापर्यंत… कसे होते दादांचे नगरमधील राजकारण?

नगर जिल्हा हा पूर्वी काँग्रेस, कन्युनिष्ठ आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. गेल्या पाच-दहा वर्षांपासून जिल्ह्यात भगवी लाट आली. तरीही अजित पवारांनी या जिल्ह्यावरील आपली पकड कायम ठेवली. गेल्या विधानसभेला 12 पैकी चार आमदार निवडून आणत, दादांनी जिल्ह्यावरील आपली पकड शाबूत असल्याचे दाखवून दिले.

श्रीरामपूर विधानसभेत महायुतीच्या जागावाटपाचा झोळ बाजूला ठेवला, तर दादांनी 100 च्या स्ट्राईक रेटने त्यांचे आमदार निवडून आणले होते. दादांचे नगरवर विशेष प्रेम होते. जन्मच नगर जिल्ह्यात झाला असल्याने, व देवळाली प्रवरा हे आजोळ असल्याने अजितदादांनी या जिल्ह्यातील तरुण नेत्यांची अख्खी फळीच तयार केली होती. कसं होतं दादांचं नगरशी नातं? हाच विषय आज आपण समजून घेऊ.

नगर जिल्हा काँग्रेस, कम्युनिष्ठांचा बालेकिल्ला. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवारांनी या जिल्ह्यावर कित्येक वर्षे अधिराज्य गाजवले. 1999 मध्ये त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर जिल्ह्यातील विखे, थोरात, राजळे, हे मातब्बर नेते वगळता इतर सर्वांनी त्यांच्यासोबत जाणे पसंत केले. हे नेते काँग्रेससोबतच राहिले.

राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर अकोल्याचे कै. मधुकरराव पिचड, यशवंतराव गडाख, दादा कळमकर, कै. शंकरराव कोल्हे, कै. दादा पाटील शेळके, बबनराव पाचपुते, रावसाहेब म्हस्के, अरुण पाटील कडू, भानुदास मुरकुटे, वसंतराव झावरे, ही नेतेमंडळी शरद पवारांसोबत गेली. त्यानंतर साधारणतः 2010 सालच्या आसपास, अजित पवार हे राष्ट्रवादीतील दखलपात्र युवा नेते झाले. जिल्ह्यातील दुसरी फळी ही शरद पवारांपेक्षा अजित पवारांकडे जास्त आकर्षित झाली. या फळीत सहाजिकच सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांची मुले होती.

शरद पवारांच्या समकालीन नेत्यांनी अजित पवारांवर जास्त विश्वास दाखवला नाही. साहेब एके साहेब, असेच त्यांचे राजकारण राहिले. पिचड, गडाख, कळमकर, कोल्हे, पाचपुते, मुरकुटे या साहेबांच्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवारांचे जास्त पटले नाही. परंतु त्यांनी कधीही या नेत्यांना त्रास दिला नाही. उलटपक्षी त्यांच्याकडून जे काही शक्य असेल, ती मदत त्यांनी आवर्जून केली.

त्याऊलट नगर जिल्ह्यात युवा पिढी राजकारणात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यात राजीव राजळे, चंद्रशेखर घुले, सिद्धार्थ मुरकुटे, सुजित झावरे, आशुतोष काळे, संग्राम जगताप, डॉ. किरण लहामटे, राहुल जगताप, वैभव पिचड, घनःश्याम शेलार, आदी नेते होते. या नेत्यांना ताकद देण्यासोबतच अजितदादांनी या तरुण नेत्यांना घेत राष्ट्रवादी समांतर पद्धतीने वाढवली. शरद पवारांनी जसा नगर जिल्ह्यात जम बसविला होता, अगदी तसाच जम अजित पवारांनीही बसवला.

त्यामुळेच तीन-चार वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रवादीच्या दोन फांगळ्या झाल्या तेव्हा हीच नेते मंडळी अजित पवारांसोबत कायम राहिली. ती शरद पवारांसोबत गेलीच नाही. अजितदादांनी याच नेत्यांपैकी चौघांनी पुन्हा 2024 मध्ये तिकीट देऊन निवडून आणले. त्यात पारनेरच्या काशिनाथ दाते, या नव्या साथीदाराचाही समावेश होता.

राजकीय धोका दिलेल्या खा. निलेश लंके, यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी पारनेरमध्ये दमदार सभा घेतली. सर्व लंके विरोधकांना एक केले. प्रशांत गायकवाड, विजय औटी, सुजित झावरेंसारखे युवा कार्यकर्तेही अजितदादांच्या एका शब्दावर शांत राहिले. या सर्वांचा परिपाक म्हणून काशिनाथ दाते आमदार झाले. राणी लंके यांचा पराभव करण्यासाठी त्यावेळी अजित पवारांनी, जिल्ह्यातील मातब्बर समजल्या जाणाऱ्या विखे कुटुंबशीही जमवून घेतले.

अजित पवारांना नगर जिल्ह्याचा चांगला आभ्यास होता. नगर जिल्ह्यात शरद पवारांचे विखे कुटुंबासोबत मतभेद होते. परंतु जिल्ह्यातील राजकारण ओळखून अजित पवारांनी हे मतभेद सोडून दिले. 2024 ची विधानसभा, त्यानंतर नगरपालिका, व त्यानंतर अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीतही अजित पवार गट याच विखे गटासोबत राहिला.

या सर्व निवडणुकीत अजित पवारांनी आपल्या पक्षाची जादू कायम ठेवली. अहिल्यानगर महानगर पालिकेत इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी सगळ्यात मोठा पक्ष बनवला. परंतु याच पालिकेच्या महापौर पदाच्या निवडीपूर्वी, अजित पवारांचे निधन झाले. अजित पवारांनी कायम सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, अकोल्याचे आ. डाँ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अजित पवारांनी मोठी संधी दिली. सामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ देणारे दादा आज आपल्यात नाहीत, ही भावना या नेत्यांना अलोट दुःख देणारी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button