मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच बातमीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. ती बातमी म्हणजे— “आता मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर कायदेशीर बंदी येणार का?” सोशल मीडियावर या बातमीवरून तरुणांच्या भन्नाट कमेंट्स येत आहेत. कुणी म्हणतंय, “आधीच लग्नाला मुली मिळत नाहीत, त्यात आता मामाची मुलगी पण गेली तर आम्ही करायचं काय?” तर कुणी विचारतंय, “हा कायदा नेमका कधीपासून लागू होणार?”
मित्रांनो, हा विषय केवळ सोशल मीडियावर हसण्यावारी नेण्याचा नाही, तर नगर जिल्ह्यासाठी हा अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही ‘अहिल्यानगर लाईव्ह २४’ चॅनलवर या विषयावर एक व्हिडीओ केलाय. त्यामध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील घटत्या मुलींच्या जन्मदराची धक्कादायक आकडेवारी समोर आणली होती.
जिल्ह्यातील तब्बल ४४ गावांमध्ये लिंगगुणोत्तर इतकं खालावलं आहे की तिथे १,००० मुलांमागे फक्त ८०० मुली जन्माला येत आहेत. म्हणजे प्रत्येक १००० तरुणांपैकी २०० तरुणांना लग्नासाठी मुलगीच नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. अशा काळात ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘मामाची मुलगी’ किंवा हा लग्नाचा एक हक्काचा आणि पारंपरिक आधार आहे.
पण आता थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल झाली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? ही याचिका कुणी आणि का दाखल केली? मामाच्या मुलीशी लग्न केल्याने नेमकं काय होतं? सुप्रीम कोर्टाने नेमका काय आदेश दिलाय आणि सरकार पुढे काय निर्णय घेऊ शकतं?
सर्वात आधी समजून घेऊया की ही याचिका नेमकी कुणी दाखल केली आहे.
बेंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या चार्वी एस. नावाच्या एका २० वर्षांच्या विद्यार्थिनीने सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. चार्वीने ही याचिका का दाखल केली? तिची स्वतःची व्यथा काय आहे?
तर चार्वी स्वतः एक दृष्टिहीन विद्यार्थिनी आहे. तिची दृष्टी ४० टक्क्यांपर्यंत निकामी झाली आहे. तिला जन्मजात ‘कोन डिस्ट्रॉफी’ आणि ‘रेटिनायटिस पिगमेंटोसा’ नावाचा डोळ्यांचा गंभीर अनुवांशिक आजार आहे. तिला उजेडाचा प्रचंड त्रास होतो, रंग ओळखता येत नाहीत आणि साधा रस्ता ओलांडतानाही तिला इतरांची मदत घ्यावी लागते. चार्वीच्या म्हणण्यानुसार, तिच्या आई-वडिलांचे लग्न त्यांच्या समाजातील परंपरेनुसार जवळच्या रक्ताच्या नात्यात झाले होते. त्यावेळी तिच्या आई-वडिलांना या लग्नामुळे होणाऱ्या वैद्यकीय परिणामांची कोणतीही माहिती नव्हती. पण त्यांच्या या निर्णयाची किंमत चार्वीला आयुष्यभर अंधत्व आणि शारीरिक अपंगत्व भोगून मोजावी लागत आहे.
तिनं याचिकेत नेमक्या काय मागण्या केल्या? ते पहा…
ज्येष्ठ वकील कादंबरी सिंह यांच्यामार्फत दाखल केलेल्या या याचिकेत चार्वीने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत :
त्यात पहिली मागणी आहे- कायद्यातील अपवाद तपासावेत :
हिंदू विवाह कायदा (कलम ५) आणि विशेष विवाह कायद्यात (कलम ४) जवळच्या नात्यात लग्नाला मनाई आहे, पण ‘रूढी आणि परंपरा’ या नावाखाली त्याला सूट दिली गेली आहे. ही सूट रद्द करावी किंवा त्यावर कडक निर्बंध आणावेत.
मागणी क्रमांक दोन- लग्नापूर्वीची वैद्यकीय तपासणी :
ज्या भागात किंवा समुदायात नात्यात लग्न करण्याची प्रथा आहे, तिथे लग्नापूर्वी जोडप्यांची ‘जेनेटिक स्क्रीनिंग’ आणि समुपदेशन सक्तीचे करावे.
मागणी क्रमांक तीन- देशव्यापी जनजागृती :
या धोक्यांबद्दल सरकारने शाळा, कॉलेज आणि ग्रामीण भागात मोठी जनजागृती मोहीम राबवावी, असं तिचं म्हणणं आहे.
मागणी क्रमांक चार- जुन्या लग्नांना धक्का नाही :
महत्त्वाचं म्हणजे, ज्यांची लग्नं आधीच नात्यात झाली आहेत, ती बेकायदेशीर ठरवू नयेत किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असेही याचिकेत स्पष्ट केले आहे.
आता आपण या विषयाची सर्वात महत्त्वाची आणि वैज्ञानिक बाजू समजून घेऊया. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या मामाच्या मुलीशी किंवा आत्याच्या मुलाशी लग्न करण्याची पद्धत आहे. मग अचानक याला विरोध का होतोय? मामाच्या मुलीशी लग्न केल्याने नेमकं काय होतं?
वैद्यकीय भाषेत अशा विवाहाला ‘कन्सँग्विनस मॅरेज’ म्हणजेच ‘समरक्त विवाह’ असं म्हणतात. जेव्हा दोन व्यक्ती एकाच कुटुंबातील किंवा जवळच्या रक्ताच्या नात्यातील असतात, तेव्हा त्यांच्या शरीरातील गुणसूत्रे म्हणजेच ‘जीन्स’ मोठ्या प्रमाणात सारखे असतात.
प्रत्येक माणसाच्या शरीरात काही सुप्त दोषयुक्त जीन्स असतात. जेव्हा आपण कुटुंबाबाहेर लग्न करतो, तेव्हा जोडीदाराचे जीन्स वेगळे असल्याने हे सुप्त दोष दबले जातात आणि पुढच्या पिढीत आजार येत नाहीत. परंतु, जेव्हा मामाची मुलगी, आत्याचा मुलगा किंवा अगदी इतर धर्माप्रमाणे चुलत बहीण-भाऊ यांच्यात लग्न होते, तेव्हा दोघांमध्येही तेच सुप्त दोषयुक्त जीन्स असण्याची शक्यता खूप जास्त असते. जेव्हा आई आणि वडील दोघांकडूनही हे दोषयुक्त जीन्स बाळामध्ये येतात, तेव्हा बाळामध्ये गंभीर अनुवांशिक आजार निर्माण होतात.
यामुळे कोणते धोके उद्भवू शकतात? तेही पहा-
जन्मजात व्यंग आणि अपंगत्व :
बाळाच्या शारीरिक किंवा मानसिक विकासात कायमस्वरूपी अडथळे येणे.
अंधत्व आणि बहिरेपणा :
डोळ्यांचे गंभीर विकार (जसे याचिकाकर्ती चार्वीला झाले आहेत) किंवा जन्मजात बहिरेपणा येणे.
रक्ताचे आजार :
थॅलेसेमिया किंवा सिकलसेल अॅनिमियासारखे जीवघेणे आजार होण्याचा धोका वाढतो.
गर्भपात आणि बालमृत्यू :
वारंवार गर्भपात होणे किंवा जन्माला आलेल्या बाळाचा लहान वयातच मृत्यू होण्याचे प्रमाण अशा विवाहांमध्ये तुलनेने अधिक असते.
आता याबाबतची आकडेवारी काय सांगते? तेही पहा-
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण च्या आकडेवारीनुसार, भारतात आजही सुमारे ११ टक्के विवाह हे रक्ताच्या नात्यात होतात. दक्षिण भारतातील तामिळनाडू (२८%), कर्नाटक (२७%) आणि आंध्र प्रदेश (२६%) या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात ही प्रथा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते.
अनेकांना असा गैरसमज झाला आहे की सुप्रीम कोर्टाने कालच मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी घातली आहे. पण मित्रांनो, सध्या अशी कोणतीही बंदी आलेली नाही. हे आधी स्पष्टपणे समजून घ्या.
सध्याचा कायदा काय आहे?
भारतातील हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम ३ (g) आणि कलम ५ नुसार, ‘सपिंड’ आणि ‘प्रतिबंधित नात्यांमध्ये’ लग्न करण्यास मनाई आहे. या नियमानुसार मामाची मुलगी किंवा आत्याची मुलगा ही प्रतिबंधित नात्यात येते. पण याच कायद्यात एक मोठा अपवाद ठेवला आहे— तो म्हणजे ‘रूढी आणि परंपरा’. जर तुमच्या समाजात, जातीत किंवा भागात मामाच्या मुलीशी लग्न करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असेल, तर कायदा त्या लग्नाला पूर्णपणे वैध मानतो. याशिवाय मुस्लिम पर्सनल लॉमध्येही अशा विवाहांना मान्यता आहे.
मग सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
तर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने अत्यंत समतोल आणि महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. ती निरिक्षणे पहा :
कोर्टाने स्पष्ट केलं की, कोणाशी लग्न करायचं हा संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे न्यायालय थेट या विवाहांवर बंदी घालू शकत नाही. शिवाय या विषयावर कायदा करायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार हा फक्त देशाच्या संसदेला आणि सरकारला आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक अत्यंत महत्त्वाची सूचना केली. ते म्हणाले की, कायद्याने बंदी घालण्यापेक्षा लोकांमध्ये यामागील विज्ञानाची माहिती पोहोचवणे जास्त गरजेचे आहे.
शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करावा, तसंच ग्रामपंचायत आणि अंगणवाडी स्तरावर याबाबत जनजागृती व्हायला हवी, जेणेकरून लोक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतील. शिवाय न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून या विषयावर सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाने बंदी घातली ही बातमी फेक आहे. त्यात तथ्य नाही.
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीशीनंतर केंद्र सरकार पुढे काय निर्णय घेऊ शकतं? तज्ज्ञांच्या मते सरकारसमोर तीन मुख्य पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे, भारतात कोट्यवधी लोकांच्या धार्मिक भावना, रूढी आणि परंपरा या विषयाशी जोडलेल्या आहेत. विशेषतः दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात ही प्रथा खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे सरकार थेट कायदा करून यावर पूर्ण बंदी घालण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण त्यामुळे मोठा सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो. दुसरा पर्याय म्हणजे, लग्नापूर्वी ‘जेनेटिक टेस्ट’ आणि समुपदेशन सक्तीचे करणे या पर्यायाचाही सरकार विचार करु शकतं.
सरकार कायद्यात अशी सुधारणा करू शकतं की, जर कोणाला जवळच्या नात्यात लग्न करायचे असेल, तर त्यांनी लग्नापूर्वी दोघांची अनुवांशिक रक्ततपासणी आणि डॉक्टरांचे समुपदेशन घेणे बंधनकारक असेल. जर दोघांचे जीन्स जुळत असतील आणि बाळाला कोणताही धोका नसेल, तर ते लग्न करू शकतील. यामुळे परंपराही जपली जाईल आणि पुढची पिढीही सुरक्षित राहील.सरकार आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून गावागावात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि शाळांच्या माध्यमातून जनजागृती करू शकतं. जसं लग्नापूर्वी आपण ‘पत्रिका’ जुळवतो, तशीच आता ‘आरोग्य पत्रिका’ किंवा ‘रक्ताचे गट आणि जीन्स’ जुळवण्याची सवय समाजाला लावली जाऊ शकते.
पण मित्रांनो, या सगळ्या चर्चेत अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रश्न कायम आहे! एकीकडे आपल्या जिल्ह्यातील ४४ गावांमध्ये १,००० मुलांमागे फक्त ८०० मुली जन्माला येत आहेत. लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून अनेक तरुण वयाची तिशी-पस्तीशी ओलांडूनही अविवाहित आहेत. अशा परिस्थितीत जर नात्यातील लग्नांवर बंधने आली, तर तरुणांची अडचण आणखी वाढू शकते. पण या समस्येचं खरं मूळ कुठे आहे, याचाही विचार आपण केला पाहिजे. जर आपण मुलगा आणि मुलगी हा भेदभाव थांबवला, स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे बंद केली आणि प्रत्येक घरात मुलीच्या जन्माचं स्वागत केलं, तर आपल्याला नात्यात लग्न करण्याची वेळच येणार नाही आणि तरुणांवर अविवाहित राहण्याची वेळ येणार नाही.





