Latest

राहाता शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही- पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

राहाता शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरोबरच शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राहाता नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ९ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामध्ये नमो गार्डन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकसित केलेले उद्यान, बालवाडी इमारत आणि वीरभद्र मंदिरामागील बाजारतळाचे सुशोभीकरण या या विकास प्रकल्पाच्या समावेश आहे. नगरपरिषदेच्या अधिकृत ‘लोगो’चेही अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, कैलास सदाफळ, मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजूरकर,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह सर्व नगरसेवक वीरभद्र ट्रस्टचे जबाजी मेचे, साहेबराव निधाने, गटनेते मुन्नाभाई शाह, गोरख दंडवते, मच्छिंद्र बनकर, राजेंद्र निकाळे,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेवक व नागरिकांना मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शहराचा विस्तार होत असल्याने नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करणे ही काळाची गरज आहे. नगरसेवकांनी केवळ विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे,” राहाता शहरातही सर्वधर्मीय सामाजिक शांतता व सलोखा कायम ठेवून विकास साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
३वर्षांत ५६ कोटींचा निधी

मागील तीन वर्षांत राहाता शहराच्या विकासासाठी तब्बल ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे असे त्यांनी सांगितले. श्रीरामपूरच्या धर्तीवर राहात्यातील नाल्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी जलसंपदा विभाग आणि नगरपालिकेने संयुक्त नियोजन करावे, यासाठी अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दुष्काळी परिस्थिती आणि फळबागांच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता, उपलब्ध पाणीसाठा पुढील नऊ महिने पुरवण्याचे नियोजन केले जात आहे. गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, संकटसमयी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत वितरित करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, २०२७ पर्यंत राहाता शहर सुंदर व जिल्ह्यासाठी आदर्श शहर बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. चितळी रोडवरील व्यापारी संकुल आणि युवकांसाठी ‘ओपन जिम’साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button