
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांची संख्या घटली असून याचा फटका व्यावसायिकांना बसत असल्याचा दावा करण्यात आलाय !
मंडळी, शिर्डी हे केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचं साधनही आहे. इथं येणाऱ्या भाविकांमुळे हॉटेल, लॉजिंग, फुलविक्रेते आणि परिसरातील शेतकऱ्यांना रोजगार मिळतो.
मात्र, साईबाबा संस्थानच्या पादुका विविध राज्यांत नेण्याच्या उपक्रमामुळे भाविकांची संख्या घटलीये आणि यावरून आता नवा वादही निर्माण झाला आहे.
साईसेवक अमृत गायके यांनी संस्थानच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पादुकांचं दर्शन आपल्या शहरातच मिळत असल्यामुळे काही भाविक शिर्डीला येणं टाळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
गायके यांनी पादुका दौरे थांबवून त्या शिर्डीतच कायमस्वरूपी दर्शनासाठी ठेवण्याची मागणी केली आहे. तसंच संस्थानच्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवरही त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
मात्र, भाविकांची संख्या नेमकी किती घटली, याची अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. त्यामुळं आता संस्थान यावर काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





