Latest

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नवं समीकरण ! पिचड आणि गायकरांमध्ये मनोमिलन, पडद्यामागे नेमक काय घडतंय?

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे ! अकोल्यात दोन जुन्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी आमदार वैभव पिचड आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यातील राजकीय दुरावा कमी करण्यासाठी कैलास वाकचौरे यांनी मध्यस्थी केल्याचे वृत्त आहे.

गुरुवारी दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. याचदरम्यान वाकचौरे यांनी ‘झालं गेलं विसरून’ पुन्हा एकत्र येण्याची भूमिका मांडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पिचड आणि गायकर यांच्यात जुळवून घेण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे.

या नव्या समीकरणाचा परिणाम आमदार किरण लहामटे यांच्या राजकीय गणितावर होऊ शकतो, अशी स्थानिक पातळीवर चर्चा आहे. लहामटे आणि गायकर यांच्यातही काही काळापासून मतभेद असल्याचे वृत्तात नमूद आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पिचड आणि गायकर यांच्यात संभाव्य तडजोडीबाबतही चर्चा रंगली आहे. मात्र हे समीकरण प्रत्यक्ष निवडणुकीत किती प्रभावी ठरेल, हे उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आणि पुढील राजकीय घडामोडींनंतर स्पष्ट होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button