
सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा देणारी मोठी बातमी हाती आली आहे ! ही बातमी आहे खाद्यतेलाच्या दराबाबत. मंडळी, केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात मोठी कपात केली आहे. २४ सप्टेंबरपासून या नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे.
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आले आहे. तर रिफाइंड सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क ३२.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के करण्यात आले आहे. सर्वात मोठा बदल सूर्यफूल तेलाच्या बाबतीत झाला आहे.
कच्च्या सूर्यफूल तेलावरील १० टक्के शुल्क पूर्णपणे हटवून ते शून्य करण्यात आले आहे. रिफाइंड सूर्यफूल तेलावरील शुल्कही ३२.५ टक्क्यांवरून २२.५ टक्के करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे खाद्यतेल आयात करण्याचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात तेलाचे दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, शुल्क कपातीचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत किती आणि कधी पोहोचतो, हे बाजारातील पुरवठा आणि किंमतींवर अवलंबून राहणार आहे.





