
महसूल कार्यालयात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे ! मंडळी, महसूल विभागाच्या कार्यालयात तक्रारी आणि गाऱ्हाणी घेऊन जाणाऱ्या नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.
नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा आणि त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवता याव्यात, यासाठी नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी प्रत्येक कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंतचा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या दोन तासांत नागरिक आपल्या तक्रारी, अडचणी आणि गाऱ्हाणी थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतील. महसूल कार्यालयांमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून, स्थानिक पातळीवरच समस्यांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे.





