
गुरुवारी मध्यरात्री राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल रुबाबसमोर झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. साडेबारा ते एकच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
शुभम तनपुरे आणि अनिकेत तनपुरे हे हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतत होते. त्याचवेळी अकोले येथील १९ वर्षीय ऋषिकेश बाळासाहेब गिऱ्हे एका महिलेसोबत मढी येथे देवदर्शनासाठी नगरच्या दिशेने जात होते.
अचानक दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने धडक इतकी भीषण झाली की ऋषिकेश गिऱ्हे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अनिकेत तनपुरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
शुभम तनपुरे यांच्यावर राहुरी येथे उपचार सुरू आहेत. तर अपघातातील महिला देखील जखमी झाली आहे. मध्यरात्रीच्या या दुर्घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





