
अहिल्यानगरमध्ये सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या एका वक्तव्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.
मंडळी, अहिल्यानगरमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर आपली भूमिका स्पष्ट केली. कोणतीही निवडणूक आली की माझंच नाव चर्चेत येतं, असं म्हणत त्यांनी अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे, आपल्या नावावर सहमती होत नसेल आणि त्यामुळे वाद निर्माण होत असेल, तर आपल्याला पदावर बसण्यात रस नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सहकार क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीलाच जिल्हा बँकेची जबाबदारी मिळावी, कारण शेतकऱ्यांना न्याय देण्याची क्षमता अशाच व्यक्तीकडे असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
याचवेळी अहिल्यानगरच्या पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कुकडी कालव्यांचं नूतनीकरण, डिंभे-माणिकडोह बोगदा आणि साकळाई योजनेचा उल्लेख करत त्यांनी जिल्हा परिषदेत भाजपला ६० जागा मिळतील, असा विश्वासही व्यक्त केला.





