
एका गावात… एका ठिकाणी… आणि फक्त १५ दिवसांत तब्बल चार बिबटे पिंजऱ्यात. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खंडाळा आणि नांदूर परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अडीच महिन्यांपूर्वी नांदूरमध्ये दोन बिबटे पकडले गेले होते. आता खंडाळ्यातही सलग बिबटे पिंजऱ्यात अडकत आहेत.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास चौथा बिबट्या पकडला गेला. मात्र त्यानंतर अवघ्या दोन तासांत एका शेतकऱ्याला याच परिसरात आणखी दोन बिबटे रस्ता ओलांडताना दिसले. त्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
बिबट्यांच्या भीतीमुळे शेतमजूर शेतात कामासाठी येण्यास घाबरत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनाच रात्रंदिवस शेतीची कामे करावी लागत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, वन विभाग फक्त पिंजरा लावण्याचा सल्ला देतो; मात्र खर्च शेतकऱ्यांनाच करावा लागतो.
पकडलेले बिबटे नेमके कुठे सोडले जातात, याबाबतही माहिती दिली जात नाही. खंडाळ्यातील ही परिस्थिती आता शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.





