
शिरूरमध्ये गणपती घेऊन घरी परतणाऱ्या तरुणांवर कार घालून, त्यानंतर गावठी पिस्तुलातून फायरिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
१४ सप्टेंबरला प्रशांत वाबळे हे मित्रासोबत शिरूरहून गणपती घेऊन म्हसेकडे परतत होते. घोडनदीवरील पुलाजवळ ते थांबले असताना आरोपींनी कार त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर किशोर शिंदे याने गावठी पिस्तुलातून वाबळे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ओम दीपक भोंडे हा शिरूरमधील बाबुरावनगर येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.





