
अहिल्यानगरमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित एक महत्वाची प्रक्रिया सुरू आहे.. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘संकलित मूल्यांकन चाचणी’, म्हणजेच PAT परीक्षा घेतली जात आहे.
मंडळी, समग्र शिक्षा अभियानांतर्गत ही परीक्षा घेतली जात असून ११ एप्रिलला मराठी आणि १५ एप्रिलला गणिताचा पेपर पार पडला आहे. आता २२ एप्रिलला इंग्रजी विषयाची चाचणी होणार आहे. या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या वय आणि इयत्तेनुसार प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. यात बहुपर्यायी आणि वर्णनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे. मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांवर विद्यार्थ्यांचं प्रभुत्व तपासलं जात आहे.
आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे, या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्यापैकी १० टक्के उत्तरपत्रिका ‘रँडम’ पद्धतीने पुन्हा तपासल्या जाणार आहेत. यामुळे निकालाची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाणार आहे.
मंडळी, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचं धोरण असल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेचं अचूक मूल्यमापन होत नव्हतं. त्यामुळे ही संकलित मूल्यांकन चाचणी म्हणजेच PAT परीक्षा घेतली जात आहे.
दरम्यान, परीक्षा पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांना भेटी देत आहेत. तसेच जास्त पटसंख्या असलेल्या शाळांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. म्हणजेच, ही परीक्षा केवळ औपचारिक नसून विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.





