
दोन वर्षांपूर्वीची शिवजयंती कोपरगावकरांसाठी धक्कादायक ठरली होती. 19 फेब्रुवारी 2024 ला एका 26 वर्षीय विवाहितेचा क्रुर पद्धतीने खून झाला होता. भर रस्त्यात या विवाहितेच्या डोक्यात लोखंडी हातोडा घालून अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला होता. घटनेनंतर कोपरगाव पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवत संशयीत आरोपी पतीला अटक केली होती. चारित्र्याचा संशय घेऊन पतीनेच पत्नीला ठार मारले होते. आता बरोबर दोन वर्षांनंतर या पतीला कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. केवळ संशयातून पत्नीचा खून करण्याची ही घटना काळीज चिरणारी होती. जिचा खून झाला होती, त्या विवाहितेला त्यावेळी आठ वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा होता. परंतु आता वडिलांनाही जन्मठेप झाल्याने ही लेकरं अनाथ झाली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. याच महाराजांची जयंती देशभर उत्साहानं साजरी होतं असताना, कोपरगाव तालुक्यात एक भयंकर घटना घडली. 19 फेब्रुवारी 2024 रोजी, शिवजयंतीच्या दिवशी महाराजांची मुर्ती हातात घेऊन, फोटो काढणाऱ्या पूजा अरुण दाभाडे या 26 वर्षीय विवाहीतेचा काही तासांतच खून झाला होता. तो फोटोच पूजाचा शेवटचा फोटो ठरला होता. विशेष म्हणजे, भर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात ही घटना घडली होती. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. कोपरगाव शहर पोलिस तत्काळ कामाला लागले. हा खून मृताच्या पतीनेच केल्याचे तपासात उघड झाले.
पूजा अरुण दाभाडे हीचे माहेर कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा होते. तर सासर कोपरगाव शहरातील टिळेकर वस्ती हे होते. पूजाचा पती आरोपी अरुण रतन दाभाडे हा भारतीय सैन्य दलात मणिपूर येथे कार्यरत होता. अरुणची बदली चंदीगड येथे झाल्याने त्याला काही दिवस सुट्टी मिळाली होती. सुटीत तो आपल्या गावी कोपरगावला आला होता. पूर्वी या दाम्पत्यात काही किरकोळ वाद असल्याने पूजा तेव्हा आपल्या दोन मुलांसह माहेरी जेऊर पाटोद्याला राहत होती.
जेऊर पाटोदा येथून शहरातील आचारी हॉस्पिटल ती गेल्या दोन महिन्यांपासून कामाला जात होती. परंतु पूर्वीपासून पती अरुणचा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, असं सांगितलं जात होतं. यापूर्वीही अरुणने पत्नी पूजावर कोयत्याने वार केले होते. तेव्हा तिला 32 टाके पडले होते. परंतु त्यानंतर पूजा आपल्या मुलांना घेऊन माहेरीच राहत होती. पूजाला आठ वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे. पूजा माहेरी राहत असल्याचा राग अरुणला होता.
19 फेब्रुवारी 2024 ला शिवजयंतीच्या निमित्ताने पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांना फोटो काढायला सांगितला. तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला. दुपारी जेवणाच्या सुटीत घरी जात असताना आरोपी अरुण दाभाडे याने पुजाला गाठले. रस्त्यातच तिच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने सपासप वार केले. पूजा लगेच रक्ताच्या थोराळ्यात पडली. ही घटना रस्त्यातच घडल्याने तत्काळ काहीजण मदतीला धावले. पोलिसांना फोन करण्यात आला.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत दाते आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मदतीने आरोपी पती अरुणला ताब्यात घेण्यात आले. पूजाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पूजाचे वडील किरण तुळशीराम पठारे यांच्या फिर्यादीवरुन पती अरुणविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर दोन वर्षे हा खटला कोपरगाव सत्र न्यायालयात चालला. सरकारी वकील शरद गुजर यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना 12 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली. कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डी. अलमले यांनी आरोपीला 5 हजार रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. केवळ चारित्र्यावर संशय घेऊन पतीने रागाच्या भरात आपला भरला संसार उद्धवस्त केला होता. आई गेली व आता वडीलही गजाआड गेल्याने दोन चिमुकले अक्षरशः अनाथ झाले आहेत. या घटनेने कोपरगावकर मात्र सुन्न झाले.





