Latest

दोन महिने, 21 अपघात आणि 10 जणांचा मृत्यू ; हायकोर्टाचा दणका ! नगर-मनमाड महामार्गावर आता कंत्राटदार अडचणीत ?

फक्त दोन महिन्यांत २१ अपघात… १० जणांचा मृत्यू… आणि आता अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नगर-मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेची गंभीर दखल घेत कंत्राटदाराला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

नगर-मनमाड महामार्गाच्या खराब अवस्थेविरोधात दाखल जनहित याचिकेत सुधारित अर्ज स्वीकारत न्यायालयाने नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कंत्राटदारासह संबंधित प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

याचिकेत महामार्गावरील खड्डे, रखडलेले काम, वाढते अपघात आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. नगर ते राहुरी हा अवघा ४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या दीड तासांहून अधिक वेळ लागत असल्याची स्थिती आहे. धूळ, खडी, वाहतूक कोंडी आणि अर्धवट कामामुळे अनेक वाहनचालकांनी हा मार्ग टाळून पर्यायी रस्त्याचा वापर सुरू केला आहे.

आता सर्वांचे लक्ष ७ ऑगस्टच्या सुनावणीकडे लागले असून, या धोकादायक महामार्गाला दिलासा मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button