
अवघ्या २० गुंठ्यातून तीन लाखांचं उत्पन्न..होय, अहिल्यानगरमधील एका शेतकऱ्याने तिहेरी पीकपद्धतीचा यशस्वी प्रयोग करून हे शक्य करून दाखवलंय. मंडळी, सध्या शेतीमालाचे बाजारभाव अनिश्चित आहेत.
कधी दर मिळतो, तर कधी तोटा होतो. पण या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोतूळ येथील शेतकरी संतोष काळे यांनी भन्नाट प्रयोग केलाय. त्यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रावर एकाच वेळी झेंडू, मिरची आणि चवळी ही तीन पिके घेतली आहेत. आधुनिक पद्धतीने मशागत, मल्चिंग आणि ड्रीप सिंचनाचा वापर करून त्यांनी हा प्रयोग सुरू केला.
२८ फेब्रुवारीला झेंडू आणि मिरचीची लागवड करण्यात आली, तर १५ एप्रिलला चवळीची लागवड केली. सध्या झेंडू पिकातून पाच मेट्रिक टन उत्पादन मिळालं असून अजून दोन टन उत्पादन अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे मिरची पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून झेंडू आणि चवळीच्या खर्चाची भरपाई होत आहे. म्हणजेच एक पीक दुसऱ्या पिकाचा खर्च उचलत आहे. आता जून महिन्यापासून चवळीचं उत्पादन सुरू होणार आहे.
झेंडू संपल्यानंतर त्याच जागेवर काकडी लावण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण तिहेरी पीकपद्धतीतून किमान तीन लाख रुपयांचा नफा मिळण्याची शक्यता आहे. मंडळी या शेतकऱ्यांसाठी एक लाईक तर बनतोच..





