
मंडळी अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. पण या वाढत्या तापमानाचा फटका फक्त माणसांनाच नाही, तर आता पशुधनालाही बसू लागलाय. अकोले तालुक्यातील डोंगरपायथ्याच्या भागात सध्या अशीच गंभीर परिस्थिती पाहायला मिळतेय. विशेषतः शेळी पालनावर उदरनिर्वाह करणारे आदिवासी कुटुंब आता मोठ्या संकटात सापडले आहेत.
यंदा तापमानाने थेट चाळीशी पार केली आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे हिरवा चारा जवळपास संपलाय. परिणामी शेळीपालकांना शेळ्यांसाठी खाद्य शोधताना अक्षरशः भटकंती करावी लागतेय. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक ठिकाणी आता शेळ्यांना कांद्याच्या वाळलेल्या पातीवर चारावं लागतंय.
सकाळी लवकर शेळ्यांचा कळप चारण्यासाठी बाहेर सोडला जातो पण अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांतच शेळ्या सावलीचा आधार शोधू लागतात. उन्हाचा चटका इतका वाढलाय की दुपारी अकरा-बारा नंतर शेळ्यांना बाहेर ठेवणंही धोकादायक ठरतंय. त्यामुळे दुपारच्या उन्हात कळप पुन्हा घरी आणला जातो आणि सायंकाळी उशिरा पुन्हा चरायला सोडलं जातं.
चाऱ्याच्या शोधात दररोज भटकंती करावी लागते. मात्र या कडक उन्हामुळे शेळ्यांसोबत स्वतःचाही जीव त्रासून जातोय. एकीकडे पाण्याची टंचाई, दुसरीकडे चाऱ्याचा प्रश्न आणि त्यात वाढतं तापमान.. त्यामुळे ग्रामीण भागातील शेळीपालकांसमोर आता जगण्याचंच मोठं आव्हान उभं राहिलंय. तुमच्या भागातही अशी परिस्थिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा..





