
खासदार निलेश लंके यांची नाराजी नेमकी कशावर? अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या बैठकीने राजकीय चर्चेला उधाण आलंय!
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीत राजकीय विरोधक मानले जाणारे बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुजय विखे पाटील एकत्र आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.
यावर लंके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. “या बैठकीचे मला निमंत्रण नव्हते. या जिल्ह्याचा मी खासदार आहे, त्यामुळे मला बैठकीला बोलवायला हवे होते. माझ्याही मतदारसंघात आठ तालुके आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या बैठकीची आणि लंके यांच्या नाराजीची राजकीय चर्चा रंगली आहे.





