
श्रीलंकेहून आणलेली पवित्र ज्योत आता अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात दाखल होणार आहे. या ज्योतीच्या स्वागतासाठी एकरुखे गावात जोरदार तयारी सुरू आहे. पण या ज्योतीचं खास महत्त्व काय?
श्रीलंकेतील इंद्राक्षी मातेच्या स्थानावरून ही पवित्र ज्योत आणण्यात आली आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र एकरुखे इथं तिचं आगमन होणार आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ज्योतीचं आणि श्रीलंकेहून सुखरूप परतलेल्या युवकांचं स्वागत होईल.
बेंगळुरू ते अहिल्यानगर आणि तिथून राहात्यापर्यंत ठिकठिकाणी ग्रामस्थांनी ज्योतीचं उत्साहात स्वागत केलंय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही युवकांचं अभिनंदन केलं आहे.
आता या ज्योतीने श्री वज्रेश्वरी मातेचा होम प्रज्वलित होणार असून, नारळ अर्पण करण्याची पारंपरिक विधीही पार पडेल. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा हा सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक एकरुखेत जमणार आहेत.





