
अहिल्यानगरमध्ये विमा कंपनीची फसवणूक करण्यासाठी रचलेला एक मोठा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. स्वतःची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देऊन इन्शुरन्सची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
मुकुंदनगर येथील एका व्यक्तीने त्याची स्कॉर्पिओ चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात ही चोरी बनावट असल्याचे समोर आले. गुप्त माहितीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.
चौकशीत आरोपींनी इन्शुरन्स क्लेम मिळवण्यासाठीच गाडी मुद्दाम लपवून ठेवली आणि चोरीचा बनाव रचल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी स्कॉर्पिओ आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पोसह तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या सतर्क तपासामुळे फसवणुकीचा हा डाव उधळला गेला असून, तिन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.





