
अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी आली आहे. गर्भलिंग निदान चाचणी आणि अवैध गर्भपात प्रकरणात श्रीगोंद्यातील एका मेडिकल चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या या रॅकेटमधील आरोपींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.
मंडळी, जालिंदर रामदास बोरुडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे मेडिकल चालवत होता. लोणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याचे नाव समोर आले होते.
अटकेची चाहूल लागल्यानंतर बोरुडे गेल्या दहा-बारा दिवसांपासून फरार होता.अखेर तो नगर तालुक्यातील हातवळण गावाजवळ स्वतःच्या शेतातील झोपडीत लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे सोनोग्राफी मशीनही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणात डॉक्टर, मेडिकल चालक, सोनोग्राफी मशीन पुरवठादार आणि एजंट अशा अनेकांचा सहभाग समोर आला आहे. त्यामुळे हा केवळ एक स्वतंत्र गुन्हा नसून एक संघटित रॅकेट असल्याचा संशय अधिक बळावला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





