Latest

सुट्टी अखरेची ठरली ! अहिल्यानगरमध्ये भीषण अपघातात मामासह दोन सख्ख्या भाच्यांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आलीये. ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भाच्यांसह मामाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मंडळी, नेवासा तालुक्यातील खरवंडी-तामसवाडी शिवारात मंगळवारी रात्री हा भीषण अपघात घडला. अभिषेक दरंदले वय १६, विजय दरंदले वय १४ आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे अशी मृतांची नावे आहेत.

सोनई येथील दत्तनगर भागात राहणारे अभिषेक आणि विजय हे दोन सख्खे भाऊ उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या मामाकडे खरवंडी येथे गेले होते. मात्र कुणालाही कल्पना नव्हती की ही सुट्टी त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरणार आहे.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खरवंडी-तामसवाडी रस्त्यावरून जात असताना अचानक ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर रस्त्यावर उलटला. या भीषण अपघातात तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले.

घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत तिघांनाही तातडीने नेवासा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. एका कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा आणि मामाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button