
अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आलीये.. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये अजूनही तब्बल १९ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ३ टीएमसीने जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
रब्बी हंगाम संपल्यानंतर आता उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा साठा मोठा दिलासा मानला जात आहे.
आता कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक आहे तेही पाहूया.. मुळा धरणात सध्या १० हजार २६४ दलघफूट म्हणजेच ३९.४८ टक्के पाणीसाठा आहे. आढळा धरणात ४७ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे. सीना धरणात ४० टक्क्यांहून अधिक साठा आहे.
भंडारदरा धरणात सध्या ३०.५७ टक्के पाणी उपलब्ध आहे, तर निळवंडे धरणात २५ टक्क्यांपर्यंत साठा शिल्लक आहे. घोड धरणात २१ टक्के पाणी आहे. मात्र भोजापूर धरणाची स्थिती चिंताजनक मानली जात आहे. येथे फक्त २.४४ टक्के इतकाच पाणीसाठा उरला आहे.
दरम्यान, वाढते तापमान, अलनिनोचा परिणाम आणि मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर जपून आणि नियोजनबद्ध करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.





