
नगरमध्ये दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या तरुणांनी थेट वाहतूक पोलिसाशीच हुज्जत घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला मारहाण करत त्याच्या गणवेशाचीही विटंबना करण्यात आली !
ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास केडगाव बायपास परिसरात घडली. वाहतूक नियमन करत असताना प्रेमराज तोगे आणि रेवणनाथ आव्हाड हे दोघे दुचाकीवरून धोकादायक पद्धतीने वाकडीतिकडी गाडी चालवताना आढळले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी त्यांना थांबवून जाब विचारला असता, दोघांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचारी अनिल आवारे यांची कॉलर पकडून झटापट केली आणि चापटांनी मारहाण केली.
या प्रकारात त्यांच्या गणवेशाचे बटण आणि नेमप्लेटही तुटली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत कायदा हातात घेणाऱ्यांना आता कायद्याचा धाक बसणार का? हा सवाल आहे.





