
नेवासा फाटा येथे शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या २२ वर्षीय मिसबा वसीम शेख यांचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिसबा या बाळंतपणासाठी नेवासा येथे माहेरी आल्या होत्या. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्या वडील आरिफ देशमुख यांच्यासोबत सोनोग्राफीसाठी नेवासा फाटा येथे गेल्या होत्या. तपासणी पूर्ण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून घरी परतत होते.
मात्र, आराध्या मंगल कार्यालयासमोर मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मिसबा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वडील आरिफ देशमुख जखमी झाले.
कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच काळाने घाला घातला. आई आणि बाळाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.





